ताज़ा खबर
 

Marathi Movie Review: नात्यांवर ताज्या हवेची फुंकर घालणारा ‘व्हेंटिलेटर’..

Ventilator Review in Marathi: हमने 'व्हेंटिलेटर' का यह रिव्यू अपने उन पाठकों के लिए उनकी ही भाषा में पेश किया है, जो मराठी बोलते-पढ़ते हैं और जिन्‍हें मराठी फिल्‍मों में दिलचस्‍पी है।
मूवी ‘व्हेंटिलेटर’ का पोस्टर।

सायली पाटील

‘व्हेंटिलेटर’….नुसतं नाव जरी घेतलं तर अनेकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता सुरुवात होते एका वेगळ्याच प्रवासाची. व्हेंटिलेटरच्या निमित्ताने सुरु झालेला नात्यांचा हा आंबटगोड प्रवास दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी या चित्रपटात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या चित्रपटामध्ये फारशी गाणी नसली तरीही पार्श्वसंगीत ही या चित्रपटातील जमेची बाजू ठरते.

गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणामध्ये सुरु होणाऱ्या या चित्रपटामध्ये कॅमेरा अगदी अचूकपणे फिरला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये विविध कलाकारांच्या गर्दीमध्ये सर्वांनाच आश्चर्य करणारा एक चेहराही अनेकांच्या भुवया उंचावायला भाग पाडतो आणि तो चेहरा म्हणजे देसी गर्ल प्रियांका चोप्राचा. अभिनेता आशुतोष गोवारीकर या चित्रपटामध्ये राजा कामेरकर नावाच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध दिग्दर्शक जेव्हा त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या (गजू काकांच्या) आजारपणामुळे कुटुंबात येतो काय आणि त्याच्यामागे पाहुण्यांचं लचांड लागतं काय…या साऱ्याचं चित्रण या चित्रपटामध्ये राजेश मापुस्करने सुरेखरित्या मांडले आहे. मुळच्या कोकणातील एका कुटुंबातील गजू काका हे पात्र आजारी पडल्यानंतर त्यांना बघायला येण्याच्या निमित्ताने सहानुभूतीच्या बंदुकीतून घराच्या आणि जमिनीच्या वादाच्या गोळ्या सोडण्यासाठी थेट रुग्णालयामध्ये गर्दी केलेल्या या कुटुंबामध्ये काही लहानसहान गोष्टींमुळे उडणारे शाब्दिक खटके आणि त्यातूनच त्यांना गवसलेली नात्यांची पाळंमुळं या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नावाजलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या चित्रपटामध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. दिग्दर्शक पडद्यामागे आणि पडद्यावर नेहमीच शंभर टक्के देत असतो याचे उदाहरण आशुतोषने साकारलेल्या राजा कामेरकर अर्थात ‘आरके’ला पाहताना सहज मिळून जाते.

हिंदी में देखें, प्रियंका चोपड़ा की मराठी फिल्म ‘वेंटिलेटर’ का रिव्यू

घरातील एक महत्त्वाची व्यक्ती त्यांच्या जीवनातील अगदी कठीण आणि संकटाच्या वळणावर असतानाच ही बातमी गावाकडे कळाल्यावर आणि गावची सर्व मंडळी गजू काकांना पाहायला आल्यावर उडालेला हा सारा कलकलाट आणि त्या प्रसंगांतूनच होणारे शाब्दिक विनोद, नातेवाईक मंडळींचे भोळेभाबडे प्रश्न या चित्रपटातून आपल्या भेटीस येतात. व्हेंटिलेटर म्हणजे काय? इथपासून सुरु झालेली ही प्रश्नांची रीघ थेट त्या रुग्णालयातील डॉक्टरांपर्यंत जाऊन पोहोचते आणि मग या कामेरकर कुटुंबातील तऱ्हेवाईक पात्रं पाहून डॉक्टरही भांबावून जातात. या चित्रपटामध्ये डॉक्टरची भूमिका साकारली आहे अभिनेता बोमन इराणी यांनी. राजकारणामध्ये स्वत:ला झोकून दिलेल्या मुलाचा आपल्या वडिलांशी असलेला अबोला आणि त्यामुळे त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याचे पडद्यावरील चित्रिकरण पाहिले की, अनेकांना हा चित्रपट त्यांच्या कुटुंबातील कोणत्या ना कोणत्या पात्राच्या अगदी जवळ जाणारा वाटू लागतो.

या चित्रपटामध्ये अभिनेता जितेंद्र जोशीने साकारलेली प्रसन्नाची भूमिका आजच्या सळसळत्या रक्ताच्या तरुणाच्या जवळ जाणारी अशीच आहे. त्यातच त्याला वडिलांचे महत्त्व पटवून देणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश आळेकर त्यांनी साकारलेल्या पात्राद्वारे अनेकांची मनं जिंकत आहेत. चित्रपटाच्या पूर्वार्धामध्ये कलाकारांच्या चालण्या-बोलण्यातून होणारे विनोद रसिकांची दाद मिळवतात. तर, उत्तरार्धात मात्र हे विनोद काहीसे दूर होत या चित्रपटाला हलकीशी गंभीर झाक मिळते. चित्रपटाचा उत्तरार्ध मोठा वाटला तरीही नात्यांतून गोडवा आणि त्यांचे महत्त्व समजावून सांगताना या वेळेकडे फारसे लक्ष जात नाही.

काकांना रुग्णालयात दाखल केल्याच्या दिवसापासून ते दुसऱ्या दिवसाच्या दुपारपर्यंतच्या थोड्या वेळाभोवतीच या चित्रपटाचे कथानक फिरते. कोणा एका आजारी व्यक्तीची भेट घ्यायला आल्यानंतर येणाऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या प्रश्नांना तिच तिच उत्तरे देणारी घरातली मंडळी आणि त्यातही एखाद्या अतिउत्साही नातेवाईकाची या सर्वांचे चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात आले आहे. लहान-मोठे अगदी वयोवृद्ध कालाकारही आहेत. त्यामुळे विविध कलाकारांच्या अभिनयाची झाक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. त्यामुळे फक्त एक व्हेंटिलेटर कामेरकरांच्या कुटुंबात धुळ खात पडलेल्या नात्यांवर ताज्या हवेची फुंकर घालतो की नाही हे जाणून घेण्यासाठी आणि दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबाचे, नात्यांचे महत्त्व जाणून घे्ण्यासाठी व्हेंटिलेटर पाहा.

दिग्दर्शक- राजेश मापुस्कर
निर्माती- प्रियांका चोप्रा, डॉ. मधु चोप्रा
प्रस्तुतकर्ते- झी स्टुडिओज
कलाकार- आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सुलभा आर्या, सुकन्या कुलकर्णी-मोने, सतीश आळेकर, विजू खोटे, उषा नाडकर्णी आणि अनेक
संगीतकार- रोहन-रोहन
गीतकार- मनोज यादव, शांताराम मापुस्कर

Hindi News से जुड़े अपडेट और व्‍यूज लगातार हासिल करने के लिए हमारे साथ फेसबुक पेज और ट्विटर हैंडल के साथ गूगल प्लस पर जुड़ें और डाउनलोड करें Hindi News App

  1. No Comments.